अनंत गीतेंची घोषणा; तटकरेंवर हल्लाबोल
| पाली | प्रतिनिधी |
सुनिल तटकरेंना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले, आता रायगड लोकसभेचा माझा मार्ग मोकळा झाला, शिवसेना नेते अनंत गीते यांचे मोठे विधान करीत आपणच आता महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. रविवार (दि.20) रोजी मराठा समाज हॉल पाली येथे पार पडलेल्या सुधागड तालुका शिवसैनिक मार्गदर्शन मेळाव्यात अनंत गीते बोलत होते.
ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी होती, त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म पाळणे गरजेचे होते. सुनिल तटकरे हे रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित होते. मात्र आता अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. सुनिल तटकरे यांना दुर्बुद्धी झाली आणि ते देखील त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे माझा रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे त्यानी सुचित केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज पाली बल्लाळेश्वराच्या आशीर्वादाने लोकसभा निवडणुकीचा हा पहिला मेळावा आहे, आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने तयारीला लागा.
अनंत गीते, माजी केंद्रीय मंत्री
शिंदे सरकारवर निशाणा भाजपचे राजकारण हे अत्यंत नीच व गलिच्छ आहे, आधी शिवसेनेला फोडले नंतर राष्ट्रवादीला फोडले. भाजप सत्तेसाठी वेडा झाला आहे. त्यांना या महाराष्ट्राची, इथल्या जनतेची चिंता नाही, त्यांना खुर्चीची चिंता आहे. आत्ताचे सरकार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला घाबरत नाही. तर, हे सरकार जनतेला घाबरत आहे. कारण जनता यांना चांगला धडा शिकवणार आहे. म्हणून हे सरकार कोणत्याही निवडणूका घ्यायला घाबरत आहे, असे टीकास्त्र शिंदे भाजप सरकारवर सोडले. सध्या ठाकरे शिवसेनेत जोरदार इन कमिंग सुरू असून मातोश्रीवर रोजच प्रवेश होत आहेत. आता पेणचे शिशिर धारकर व समीर म्हात्रे हे देखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रवेश करणार असल्याची माहिती अनंत गीते यांनी आपल्या भाषणात दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, राजेंद्र राऊत, दिनेश चिले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विष्णु पाटील, अविनाश म्हात्रे, विनेश सितापराव, जगदीश ठाकूर, अश्विनी रुईकर, वर्षा सुरावकर, सचिन जवके, रमेश सुतार, सचिन ढोबळे, किशोर दिघे, नारायण दळवी, ओंकार खोडागळे, सूरज गुप्ता, रोहन राऊत, किशोर खरीवले, सदू भोईर, प्रशांत शितोळे आदींसह शिवसैनिक पदाधिकारी, महिला व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.