कर्जत ,प्रतिनिधी
कर्जत तालुका अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन रॉयल गार्डनच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सभेला भगवान चंचे, हनुमंत पिंगळे एच. आर. पाटील, अंकित साखरे, अशोक भोपतराव, भरत भगत, भगवान भोईर, एकनाथ धुळे, अशोक सावंत, ॲड. रंजना धुळे दीपक श्रीखंडे, शरद कदम, ॲड. राजेंद्र निगुडकर, अजय सावंत,शिवाजी खारीक, ॲड स्वप्नील पालकर, माथेरान शहराध्यक्ष राजेश दळवी आदींसह नगरसेवक, सरपंच व्यासपीठावर उपस्थित होते.
एकनाथ धुळे यांनी प्रास्ताविकात आपल्याला अजित पर्व तयार करायचे आहे. त्याची दिशा या गर्दीवरून ठरली आहे. सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला पक्ष संघटना बळकट करायची आहे. असे सूचित केले. त्यानंतर तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागवार कार्यकारिणी अशी सुमारे दीडशे नियुक्तीपत्रे देण्यात आली तर शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रंजना धुळे,अशोक भोपतराव,राजाभाऊ कोठारी ,राजेंद्र निगुडकर, भरत भगत,अजय सावंत, अंकित साखरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन समीर सोमणे यांनी केले. याप्रसंगी सभागृह खचाखच भरले होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत आयत्या वेळी उमेदवारीची तयारी करायला सांगितली. त्यानंतर मला थांबायला सांगितले. मी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य करून इमाने इतबारे काम केले. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात धावून गेलो. कार्यकर्त्यांना धीर दिला. रायगड जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पक्षातील सर्व कार्यकर्त्यांशी माझी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे संघटना वाढली ही माझी चूक आहे का ?
सुधाकर घारे, राजिपचे माजी उपाध्यक्ष