| उरण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेत शिक्षकाच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक तथा वित्त लेखा सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना एसीबीने रंगेहाथ पकडल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदलीसारख्या प्रशासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.
एका कर्मचाऱ्यावर कारवाई झाली म्हणून प्रकरण संपणारे नाही. उलट या कारवाईने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कथित टक्केवारी, फाईल पुढे सरकवण्यासाठी होणारे व्यवहार आणि विकासकामांतील ‘गळती’च्या चर्चांना पुन्हा तोंड फुटले आहे. रस्ते, पाणी, गटारे, शाळा आणि इतर विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी येतो. या निधीचा प्रत्यक्ष विकासासाठी किती वापर होतो आणि प्रक्रियेत किती ‘गळती’ होते, याची तपासणी होण्याची गरज आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधातील तक्रारी, विकासकामे, निविदा, देयके आणि बदली प्रकरणांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी आता पुढे येत आहे. तक्रारी खऱ्या असतील तर कारवाई आणि खोट्या असतील तर सत्य जनतेसमोर आणण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, एसीबीच्या कारवाईतील भस्मे यांची नेमकी भूमिका, बदली प्रक्रियेतील त्यांचा अधिकार आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणावरही दोष निश्चित करणे योग्य ठरणार नाही. मात्र, दीड लाखांच्या लाचेने उघडलेले हे प्रकरण आता झेडपीच्या चार भिंतींपलीकडे जाऊन पंचायत समित्यांपर्यंत पोहोचणार का, याकडे रायगडचे लक्ष लागले आहे.







