रसायनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा
| खालापूर | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील मोहापाडा येथील एका महिलेने भीशी चालविण्याच्या नावावर खातेदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. महिन्याला पाच टक्के व्याजदराने म्हणजे वार्षिक 60 टक्के व्याज दराने परतावा देण्याची स्कीम सांगून हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन ते हडप केले. अशाप्रकारच्या दोन स्कीम चालवून अनेक खातेदारांचे कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करून या महिलेने फसवणूक केली असल्याच्या तक्रारी पोलिसाना प्राप्त झाल्या आहेत.
फसवणूक झालेल्यांमध्ये बहुतांशी महिला खातेदार आहेत. या महिला पैसे मागण्यासाठी गेल्या असता महिलेने ते मान्य केले की आमच्याकडे 100 खातेदारांचे अंदाजे 1.5 कोटी रुपये देणे आहे, त्याची नोंद माझ्या डायरीमध्ये करून ठेवली आहे. माझे घर विकून मी पैसे परत करेन. पण ते कधी विकणार याची खात्री दिली नाही. खातेदारांना दिलेले पोस्ट डेटेड चेक हे खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले आहेत. अनेक महिने वाट पाहून शेवटी कोणताही पर्याय नसल्यामुळे सुमारे चाळीस खातेदारांनी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगर यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलीस त्याचा कसून तपास करीत आहेत. तपासामध्ये महिलेने एक कोटी 68 लाख रुपये देणे लागत असल्याचे स्वतः मान्य केले आहे. पैसे परत देत नसल्याने कोणताही पर्याय नसल्यामुळे एकूण चाळीस तक्रारदारांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांना प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रसायनी संजय बांगर यांना खोलवर तपास करून पुरावे तपासण्यास सांगितले. महिला पैसे देण्यास तयार आहे का? हे विचारण्यास सांगितले. परंतु महिला पैसे परत देण्यास तयार नसल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनूसार, तक्रारदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाईल आणि फसवणूक झालेली रक्कम देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. महिलेने या पैशातून अनेक मालमत्ता विकत घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ते तपासामध्ये उघड होईल. तिने हे पैसे वापरून मोहोपाडा इथे मोठी बिल्डिंग बांधून त्यात ती कुटुंबासह वास्तव्यास आहे. वर्षातून दोन तीन वेळा फॉरेन ट्रिपला आपल्या कुटुंबासह जात होत्या. नवरा साधा ग्रामपंचायत कर्मचारी असूनदेखील एवढी मालमत्ता कुठून जमवली? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका खातेदाराकडून पन्नास हजार रुपयांचे अनेक बंडल घेतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.






