| अलिबाग | प्रतिनिधी |
घरकूल योजनेसह वेगवेगळी कामे करून देण्याचा बहाणा करून महिलेनेच महिलेची 24 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी अलिबाग येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरोपी महिलेला दोषी ठरवून न्यायालयाने दोन वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली.
विमल श्रीकांत सुर्यवंशी उर्फ मंगल रविंद्र मोरे (वय 55 वर्षे ) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला मुळची पूणे जिल्ह्यातील असून सध्या भाड्याने वेश्वीमध्ये राहत होती. या महिलेच्या शेजारी सुनिता कांबळे ही महिलादेखील तिच्या कुटूंबियांसमवेत राहत आहे. शेजारी असल्याने आरोपी विमल या महिलेची सुनिता कांबळे यांच्याशी ओळख झाली. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात घरकूल योजनांसंदर्भात काम करीत असल्याचे सांगून विमलने सुनिता कांबळे या महिलेचा विश्वास संपादन केला. घरकूलचे काम करून दिले जाईल, त्यासाठी पहिला अर्ज भरण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. हक्काचे घर मिळेल या आशेने विमलच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनिताने 4 जूलै 2022 रोजी आरोपी महिलेला पाच हजार रुपयांची रोख रक्कम दिली. त्यानंतर विमलने अर्ज भरला आहे. परंतू पुन्हा पाच हजार रुपये भरावे लागतील असे सांगून सुनिताकडून पाच हजार रुपयांची मागणी केली.
सुनिताने सोन्याचे दागीने बँकेत गहाण ठेवून पुन्हा पाच हजार रुपये दिले. त्यानंतर पुन्हा विमलने वेगवेगळी कारणे सांगून सुनीताची आर्थिक लुट करण्यास सुरुवात केली. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून परत सुनीताने आठ हजार रुपये विमलला दिले. तसेच नवीन रेशनकार्ड काढण्याचा बहाणा करीत तीन हजार रुपये व होलसेल दरात किराणा सामान आणून देण्याचे कारण दाखवून दीड हजार रुपये असे एकूण 24 हजार 500 रुपये आरोपी विमलने घेतले. परंतू कोणतेही काम करून दिले नाही. वेळोवेळी कामाबाबत व पैशाची विचारणा विमलला केल्यावर ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागली.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे सुनीताच्या लक्षात आल्यावर 8 सप्टेंबर 2022 रोजी विमल सुर्यवंशी या महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याप्रकरणी तक्रार केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश निगडे यांनी तपास सुुरू केला. या तपासात विमलने आर्थिक लुट केल्याचे लक्षात आल्यावर तिला अटक करून तिच्याविरोधात अलिबाग येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अलिबाग येथील न्यायालयातील न्यायाधीश एस. डब्लू उगले यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे ॲड. परीट यांनी काम पाहिले. पोलीस तपास, असलेले वेगवेगळे पुरावे ग्राह्य धरून विमल सुर्यवंशी या महिलेला दोषी ठरवत न्यायालयाने तीला दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.