महिलेची छेड काढणारा गजाआड

। रसायनी । वार्ताहर ।

बदलापूर येथील मुलींवर लैंगिक अत्याचारांच्या घटना ताज्या असतानाच चौक-वाशीवली रस्त्यावर तुपगाव हद्दीत जाणार्‍या रस्त्यावर एका महिलेची तरुणाने छेड काढल्याची घटना घडली.

शुक्रवारी सकाळी आपल्या लहान मुलांना शाळेतून आणण्यासाठी तुपगाव येथील दोन महिला येत असताना एका अज्ञात व्यक्तीने रस्त्याच्या कडेला वाढलेल्या मोठ्या गवतातून बाहेर येऊन एका महिलेचा हात धरला. दुसर्‍या महिलेकडे मोबाईलची मागणी केली. अचानक घडलेल्या घटनेने दोघी महिला घाबरल्या. त्यांनी आरडाओरड सुरू केली असता अज्ञात व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला. दोन्ही घाबरलेल्या महिलांनी आपल्या घरच्या लोकांबरोबर चौक दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौक पोलिसांनी घडलेल्या ठिकाणी जाऊन तपास करण्यास सुरुवात केली. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून फुटेज पडताळणी केली असता संशयी माणूस रसायनीतील रीस येथील भटवाडी येथे राहत असल्याचे समझले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चार महिलांनी त्याला ओळखले आहे. पुढील तपास करण्यासाठी त्याला खालापूर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे.

Exit mobile version