आरोपी चार तासांत जेरबंद
| पनवेल | प्रतिनिधी |
चहाच्या टपरीवर असलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या पथकाने अवघ्या चार तासांत अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेला चाकू, दोन लोखंडी कोयते आणि काळ्या रंगाची बॅग हस्तगत करण्यात आली. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
बारवई येथे ही घटना घडली. चार आरोपींनी मीना कातकरी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी रात्री पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंदापूर पोलिसांच्या मदतीने मंगेश देसाई काळे ऊर्फ राहुल कांता राज पवार ऊर्फ मंजू (19) याला ताब्यात घेण्यात आले. तो सध्या सरडेवाडी, इंदापूर येथे राहत असून मूळचा डोमेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीकडून पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यासह शहापूर पोलीस ठाणे, इचलकरंजी, कोल्हापूर येथील आणखी एक गुन्हा उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील रोहित देसाई पवार (21), शायद गणेश काळे (22) आणि आकाश काळे (21) हे तीन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
