| पनवेल | वार्ताहर |
खारघर मधील 30 वर्षीय महिलेला घणसोलीमध्ये राहणार्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे तसेच तिच्याकडून तब्बल 60 लाख रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ध्रुव नंदलाल परमार उर्फ पटेल (34) असे या आरोपीचे नाव असून, त्याने पीडित महिलेचे अश्लिल व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मारहाण देखील केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. खारघर पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील पीडित महिला खारघर येथे राहण्यास असून, ती हॉटेलमध्ये कामाला आहे. आरोपी ध्रुव परमार सदर हॉटेलमध्ये नियमित जात असल्याने वर्षभरापूर्वी त्याची पीडित महिलेसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी परमार याने पीडित महिलेसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित महिला गर्भवती राहिल्याने आरोपी परमार याने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतला. याशिवाय त्याने तिच्याकडून थोडे-थोडे करत तब्बल 60 लाख रुपये घेतले.
पीडित महिलेने सदर रक्कम परत मागितली असता, परमार याने तिला तिची रक्कम परत न करता तिची फसवणूक केली. तसेच त्याने तिच्या नकळत तिचे अश्लिल व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यासोबतच तिला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित महिलेने खारघर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी आरोपी ध्रुव परमार उर्फ पटेल याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास खारघर पोलीस करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
