। पनवेल । प्रतिनिधी ।
रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख 10 हजार रुपये किंमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि लॉकेट काळ्या रेनकोटमधील तिघा लुटारुंनी खेचून पलायन केल्याची घटना पनवेलमध्ये घडली.
या प्रकरणातील तक्रारदार महिला पनवेल मधील नेहमी गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून पायी चालत जात होत्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या 3 अज्ञात लुटारुंनी त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या गळ्यातील 2 लाख 10 हजार रुपये किमतीची 30 ग्रॅम (3 तोळे) वजनाची सोन्याची चेन आणि त्यात असलेले सोन्याचे लॉकेट खेचले. त्यानंतर सदर लुटारुंनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. या घटनेनंतर सदर महिलेने तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात लुटारु विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील तिन्ही लुटारुंचे अंदाजे वय 16 ते 18 वर्षे दरम्यान असून ते अल्पवयीन असण्याची शक्यता तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ओळख पटू नये यासाठी तिघांनीही अंगात सारख्याच पध्दतीचे काळ्या रंगाचे रेनकोट घातल्याची माहितीही तक्रारदार महिलेने दिली आहे. या वर्णनावरुन पोलिसांनी तिघा लुटारुंचा शोध सुरु केला आहे.
भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची लूट
