| तळा | प्रतिनिधी |
वटपौर्णिमेसाठी लागणारी फळे, साहित्य खरेदीसाठी तळा बाजारपेठेत महिलांनी एकच गर्दी केली होती. वटपौर्णिमेनिमित्त आदल्या दिवशी आदिवासी महिला फणसाचे गरे, आलू, जांभळं, करवंद, ओटीचे साहित्य इ. वस्तू घेऊन तळा बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. या सर्व फळांचे वाटे घालून प्रत्येकी वीस रुपये वाटाप्रमाणे विक्री करण्यात येत होती.
तळा बाजारपेठेत रस्त्यावरच आदिवासी महिला दाटीवाटीने रानमेवा विक्रीसाठी बसल्या होत्या. महिलांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या वटपौर्णिमेसाठी या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग पाहायला मिळाली. यामुळे आदिवासी महिलांनाही रोजगार उपलब्ध होऊन रानमेवा विक्रीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहदेखील भागविला जात आहे.