| उरण | प्रतिनिधी |
‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘प्लास्टिक बंदी’, ‘हरित उरण’ या सगळ्या घोषणा दरवर्षी हवेत झुलतात, पण जमिनीवर फक्त गोंधळ, भ्रष्टाचार आणि प्लास्टिकचा खच दिसतो. कारण, उरण नगरपालिकेने पर्यावरण दिनाचंही बाजारीकरण केलंय आणि वीर सावरकर मैदान डंपिंग ग्राउंड बनवून टाकलंय, असा आरोप उरणकरांकडून करण्यात येत आहे.
पर्यावरण दिनाच्या दिवशी पालिका अधिकारी छातीठोक फोटो काढतात, पोस्टर लावतात, बॅनर फडकावतात, पण दुसऱ्याच दिवशी वीर सावरकर मैदानावर फेकलेला कचरा, पसरलेले प्लास्टिक आणि दारुड्यांचे अड्डे ‘हीच का हरितक्रांती?’ असा सवाल विचारायला लावतात. सावरकर मैदान हे लहान मुलांच्या खेळासाठी आहे. पण, आज तेच मैदान कचऱ्याच्या ढिगाऱ्याने बुजलेलं, दारुड्यांच्या थुकवाट्यांनी भरलेलं आणि लोकांच्या आरोग्यावर घाला घालणारं बनलंय. शासन झोपलंय की सोंग घेतंय हेच आता विचारायची वेळ आलीय! पर्यावरण वाचवायचं असेल, तर आधी या ढोंगी पालिकेपासून शहर वाचवा, अशी थेट मागणी आता नागरिक करत आहेत. चौकशी नाही झाली, तर येत्या काळात जनतेचा संताप उरण पालिकेवर फोडला जाणार, हे मात्र निश्चित.