| उरण | प्रतिनिधी |
वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ विविध साहित्याने व फळांनी सजली आहे. मंगळवार, दि. 10 जून रोजी वटपौर्णिमा असल्याने बाजारपेठेत महिलांनी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. पूजेच्या साहित्यासह आंबा, फणसाचे गरे, डाळिंब, करवंद, आलूबुखार, केळी, सफरचंद अशा विविध प्रकारची फळे बाजारात दाखल झाली आहेत.
पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग बाजारपेठेत पाहायला मिळाली. दरवर्षी सायंकाळच्या निवांत वेळेत महिला वटपौर्णिमेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. या व्रतासाठी विविध प्रकारची फळे, काळे मण्यांचे सर, धागा, करडा इत्यादी वस्तू लागतात. या वस्तूंनी महिला वाण सजवतात. सजवलेल्या वाणाने वडाची पूजा केली जाते. पूजेचे वाण सुवासिनी एकमेकींना सौभाग्याचे लेणे म्हणून देतात. यावेळी वाणामध्ये लागणाऱ्या फळांची खरेदीदेखील करण्यात येते. त्यामुळे पूजेच्या साहित्यासह आंबा, फणसाचे गरे, डाळिंब, करवंद, आलूबुखार, केळी, सफरचंद अशा विविध प्रकारची फळे बाजारात दाखल झाली आहेत. बाजारामध्ये छोटे आंबे 60 ते 120 रुपये भावाने विक्री केली जात आहे. वाण, सूत, पूजेसाठी लागणारी पाच प्रकारची छोटी फळे प्रत्येकी 20 रुपये भावाने विक्री करण्यात येत आहे.
फणसाची आवक वाढली :
एकीकडे आंब्याची आवक कमी झालेली असताना, दुसरीकडे फणसाची आवक मात्र वाढली आहे. फणस आता मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाला आहे. फणसाची गोडी चाखण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. 100 ते 500 रुपयापर्यंत फणस विकला जात असल्याचे विक्रेत्याने सांगितले. वटपौर्णिमेनिमित्त फणसाची आवक वाढली असून, या एक ते दोन दिवसात ती आणखीन वाढणार असल्याचे चित्र आहे.