पहिल्याच पावसात रूंदीकरणाच्या कामाचा फटका
| खांब | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचे चालू असलेल्या कामाला नुकताच सुरू झालेल्या पावसामुळे चांगलाच फटका बसला असून, कोलाड ते पुईदरम्यान आता दररोज मोठीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असताना दिसत आहे.
गेली दहा वर्षांहून अधिक काळापासून चालत असलेले रूंदीकरणाचे बांधकाम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने दैनंदिन प्रवास करणारे, प्रवासीवर्ग व वाहनचालक यांना महामार्गावरून प्रवास करताना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर, काही ठिकाणी रूंदीकरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, साईडपट्टीची कामे तसेच अन्य रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने त्यामुळेही समस्या भेडसावताना दिसत आहे. तर, कोलाड ते पुईदरम्यान अपूर्णावस्थेत असलेल्या महामार्गाच्या रस्त्याचे बांधकाम व साईडपट्टीची कामे समस्येत आणखी भर घालताना दिसत आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी सुरूवात केली आहे. त्यातच रोहा तालुक्यातील काही भागात मागील आठवड्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असल्याने त्या पावसाचा फटकाही महामार्गावर सुरू असलेल्या रूंदीकरणाचे कामाला चांगलाच बसला असल्याचे पहावयास मिळाल्याने कोलाड ते पुई येथे मात्र दिवसातून अनेकवेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने साऱ्यांना चांगलाच मनस्ताप पत्करावा लागत आहे.