ज्येष्ठांकडून कर्तृत्वान महिलांचा सन्मान

रेवदंडा येथे जागतिक महिला दिन उत्साहात

| चौल | प्रतिनिधी |

रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनील कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करुन त्यांना आशीर्वाद देण्यात आले. रेवदंडा येथे ज्येष्ठ नागरिक संस्थेची मासिक सभा सरोज वरसोलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात ॲड. मनिषा लोहार, विमल भोईर, सीमा खेडेकर आणि सुहासिनी शेंड्ये या कर्तृत्ववान महिलांचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चौल पंचायत समिती गणाच्या नवनिर्वाचित सदस्या अंकिता घरत यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ॲड. मनिषा लोहार यांनी महिलांचे समाजातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आज महिला शिक्षण, प्रशासन, कायदा, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून, समाज परिवर्तनात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांनी स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.



यासोबतच ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून, त्यांच्या अनुभवातून समाजाला दिशा मिळते, असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर अडचणी किंवा कौटुंबिक समस्या आल्यास त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आपण कायम तत्पर राहू, अशी ग्वाही ॲड. लोहार यांनी यावेळी दिली. समाजात महिला सन्मान, कुटुंबातील एकता आणि ज्येष्ठांचा आदर टिकवून ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश खडपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भगवान तांबडकर, मंगेश वडके, शरद वरसोलकर, रा.दि. राऊत, भालचंद्र नाईक, विलास घोसाळकर, लता चिटणीस, अलका देवधर आणि अपर्णा पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महिला सन्मानाचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला.

Exit mobile version