। अलिबाग । प्रतिनिधी ।
खारेपाट विभागातील ही भूमी संघर्ष करणारी आहे. या भूमीत हक्कासाठी अनेक लढे झाले आहेत. अॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, यांच्यासह शेकापचे नेते जयंत पाटील, पंडित पाटील, भावना पाटील, आस्वाद पाटील यांनीदेखील त्यांचा वारसा जपत या भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. या विधानसभेच्या निवडणूकीत विरोधकांना स्त्री-शक्तीची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. शिवबा, जिजाऊच्या लेकी परक्याचा वाटा घेणार नाही, असा निर्णय घेत महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी पुढे यावे, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.
चित्रलेखा पाटील यांनी महिलांसाठी मेळावे सुरु केल्यावर विरोधकांनाही वाटले आपणही मेळावे घ्यावे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. मेळाव्यात मार्गदर्शन करताना पुढे अॅड. म्हात्रे म्हणाल्या कि, हाशिवरे येथील बालवीर मैदानात शेकापमार्फत महिला संवाद मेळावा होत आहे. हाच मेळावा पुढच्या इतिहासाची नांदी असणार आहे. या मेळाव्यातून एक वेगळी उमेद, शक्ती घेऊन महिलांनी परिवर्तन घडविण्याचे काम केले पाहिजे. महिलांनी वेळप्रसंगी दोन हात करून अन्यायाविरोधात लढले पहिजे. पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार आहे. सरकारने महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
महिलेच्या हाती विकासाची दोरी द्या. त्याचा उपयोग देशाच्या, राज्याच्या, जिल्हा, तालुका, गाव व समाजाच्या विकासासाठी महिला निश्चित करेल. महिलांनी सुरु केलेले रोजगाराचे दालन बंद करण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी करीत असेल, तर ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतचा निर्णय महिला ठरवेल, याची जाणीव असणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.







