महिलांनी अत्याचाराविरोधात पेटून उठा- सीमा घरत

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सरकार आपल्याच टॅक्समधून योजना राबवित आहे. सध्या लाडकी बहिण योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून दीड हजार रुपये महिलांना दिले जातात. मात्र महागाई गगनाला भिडली आहे. महिन्यातील खर्चाचा ताळमेळ बसविताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महिला सुरक्षेचा प्रश्‍नदेखील गंभीर आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी लढणारी महिला आमदार झाली पाहिजे. असा प्रत्येक महिलेने निश्‍चय केला पाहिजे. अत्याचाराबरोबरच अन्यायाविरोधात महिलांनी पेटून उठले पाहिजे, असे आवाहन शेकाप उरण तालुका महिला आघाडी प्रमुख सीमा घरत यांनी केले.

शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांनी मंत्री, आमदार असताना जिल्ह्यातील विकासासाठी काम केले. अलिबागसह रायगडच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रलेखा पाटील आज समाजात काम करीत आहेत. चित्रलेखा पाटील यांनी रात्रीचा दिवस करून कोरोना काळात काम केले. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी मुलींसाठी सायकल वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

राज्यात सध्या भयावह परिस्थिती आहे. महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. रोजगाराचा प्रश्‍न आहे. अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे आपले प्रश्‍न मांडणारी महिला आमदार झाली पाहिजे ही आपली भुमिका आहे. त्यानूसार महिलांनी कामाला लागा, असे आवाहन घरत यांनी केले.

Exit mobile version