। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतमधील वांजळे गावातील एका कुटुंबातील दोन महिला सदस्य उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून प्रशासनाने उपोषण सोडविण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या उपोषणकर्त्या महिला प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील वांजळे गावातील ठाकरे कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीवरील बांधकाम काढण्याच्या प्रकरणात उपोषण सुरू केले आहे. या अन्यायाविरोधात कांचन ठाकरे आणि मिरा ठाकरे या मायलेकी मागील नऊ दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत. कर्जत प्रशासकीय भवन येथे सुरू असलेल्या उपोषणाला अद्याप महसूल प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे येत्या प्रजासत्ताक दिनी या दोन्ही महिला आत्मदहन करणार आहेत. ठाकरे कुटुंबाचे वडिलोपार्जित जमिनीवरील बांधकामावर कारवाई करताना नियमांची पायमल्ली झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि गट विकास अधिकार्यांनी कोणतीही योग्य प्रक्रिया न पाळता बेकायदेशीरपणे आपल्या मालमत्तेवर हातोडा मारला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.