पाण्यासाठी वणवण थांबेना!

महिलांची दोन किलोमीटर पायपीट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधींचे आराखडे, योजना आणि घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे भीषण वास्तव रायगड जिल्ह्यात समोर आले आहे. रोहा तालुक्यातील 26 गावांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही आजही महिलांना डोक्यावर हंडे, प्लास्टिकचे ड्रम घेऊन तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने संताप उफाळून आला आहे.

रोहा तालुक्यातील शेणवई, शेणवईवाडी, शेणवई आदिवासीवाडी, लक्ष्मीनगर, डोंगरी, खार, वावेखार, झोलंबे, झोलंबे आदिवासीवाडी, भातसई, खारआपटी, निडी, पडम, यशवंतखार, धोंडखार, करंजवीरा आदी 26 गावांसाठी अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चूनही या गावांमध्ये पाण्याचा थेंबही घरापर्यंत पोहोचलेला नाही, अशी स्थिती आहे.

जलजीवन योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आली, कामे पूर्ण झाल्याचे दाखवले गेले; पण प्रत्यक्षात नळ कोरडेच असल्याचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, योजना कागदावर पूर्ण, पण गाव तहानलेलेफ असे वास्तव या भागात पाहायला मिळत आहे. अनेक वेळा ग्रामस्थ आणि महिला शासन दरबारी धाव घेत असतानाही केवळ आश्वासनांचीच बरसात होत असून, अंमलबजावणी मात्र शून्य असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या सण-उत्सव आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावागावात उत्सवांचा जल्लोष सुरू असताना महिलांना 20 ते 25 मिनिटे उन्हात चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी महिलांना प्लास्टिकचे ड्रम, हंडे डोक्यावर वाहून पाणी आणण्याची वेळ आली आहे.
पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधींचा खर्च करूनही प्रत्यक्षात सुविधा मिळत नसल्याने ङ्गहा पैसा गेला कुठे?फ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आजही नागरिकांना मूलभूत गरजेसाठी संघर्ष करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात पाण्यासाठी रांगा, पायपीट आणि त्रास सहन करणाऱ्या महिलांचे हाल पाहूनही प्रशासन गप्प असल्याने संताप अधिकच वाढत आहे. तात्काळ ठोस उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

Exit mobile version