योजनांच्या अंमलबजावणीत महिलांचा सहभाग महत्वाचा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता मिशन कक्ष तसेच अलिबाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ्ता अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या महिला सरपंचांना व पिण्याचे पाणी स्त्रोत नमुने घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांना स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023 ने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गुरुवारी (दि.9) गौरविण्यात आले. यावेळी शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग महत्वाचा असल्याचे मत डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले.

स्वच्छ सुजल शक्ती सन्मान सोहळा 2023 जिल्हा परिषदेच्या कै. ना. ना. पाटील सभागृहात पार पडला. यावेळी जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसे गाव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ओला व सुका कचरा वेगळा करावा. प्रत्येक ग्रामपंचायत स्वच्छतेच्या बाबतीत सजग असावी अशी आशा डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केली. तसेच समाजाच्या उन्नतीसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. गावागावात शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यात जास्तीत जास्त महिलांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे, असेही डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

शक्ती सन्मान 2023 ने स्वच्छ्ता अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचांना व पिण्याचे पाणी स्त्रोत नमुने घेणार्‍या 5 महिला कर्मचार्‍यांना गौरविण्यात आले. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version