पाणी प्रश्नाबाबत खारेपाटील महिला आक्रमक
। पेण । वार्ताहर ।
पेण तालुका व खारेपाट विभागातील पाणी प्रश्न गेली अनेक वर्ष भेडसावत आहे. वर्षानुवर्षाच्या पाण्याच्या समस्येमुळे काहींना जीव गमवावा लागला तर बर्याच जणांना अपघात झाले. मुली व महिलांचा दिवस दूर अंतरावरून पाणी कष्टाने आणण्यात जातो. फक्त पंधरा मिनिटेच पाणी येते आणि ते सुद्धा अशुद्ध व गढूळ पाणी असते. कुठे दोन दिवसा आड, कुठे पाच दिवसांनी तर कुठे आठवड्यातून एकदाच पाणी येते. ठाकूर बेडी, मळेघर पंचक्रोशी इत्यादी ठिकाणी तर नळाला पाणी येतच नाही व टँकरसुद्धा तिथे जात नाही. पागोळीचे पाणी व ते संपल्यानंतर विकतचे पाणी असा जीवनक्रम सुरू आहे.
हेटवणे धरण, शहापाडा धरण, नदी, तलाव असे जलसाठे असताना देखील गेली वीस ते तीस वर्षे पेण तालुका व खारेपाट विभागातील लोक पाण्यापासून वंचित आहेत. धरणाचे कालवे काढणे, गाळ उपसणे इत्यादी कामे होत नसल्याने येथील ग्रामस्थ, लहान मुले व वृद्ध स्त्री-पुरुष यांचे जीवन हालाखीचे बनले आहे. नेहमीच काम पावसाळ्यापूर्वी होणार, पाईपलाईन दुरुस्तीचे काम या महिन्यात होईल अशी उत्तरे कायमच प्रशासनाकडून दिली जातात. इतक्या वर्षाच्या सहनशक्तीचा बांध आता तुटत चालला आहे. म्हणूनच यातून मार्ग काढण्यासाठी सर्व ग्रामस्थ व नागरिकांच्या सहकार्याने पाणी प्रश्नासाठी बुधवारी (दि.2) महिला आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रॅली प्रांत कार्यालय येथे जाणार आहे. प्रांत कार्यालय पेण येथे रॅलीचे रूपांतर ठिय्या आंदोलनात करण्यात येणार आहे. पाणीप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व महिला करणार आहेत. या आंदोलनाला समर्थन व पाठिंबा देण्यासाठी शहरातील भगिनी, मुली, महिला, पुरुषांनी ही सहभाग द्यावा असे आवाहन पेण तालुक्यातील महिलांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी केले आहे.
महिलांचे ठिय्या आंदोलन
