सूर्याची बॅट तळपली

भारताने तिसरा टी-20 सामना जिंकला

| प्रॉव्हिडन्स | वृत्तसंस्था |

भारताने तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले. करो या मरो, अशी स्थिती असलेल्या या सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात एकट्या सूर्यकुमार यादवने अर्ध्याहून अधिक धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाची भर घातली.

सूर्या 44 चेंडूत 83 धावा करून बाद झाला. तो ज्या प्रकारे खेळत होता, ते पाहता त्याने सहज आपला चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय बनवले असते, पण हवाई शॉट खेळताना तो सीमारेषेवर झेलबाद झाला. युवा फलंदाज तिलक वर्माचेही त्याच्या दुसऱ्या सामन्यात सलग दुसरे अर्धशतक हुकले. तो 9 धावांवर नाबाद परतला तेव्हा स्ट्राइक एंडला उभा असलेला कर्णधार हार्दिक पांड्याने षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. आता या मालिकेतील चौथा सामना 12 तारखेला फ्लोरिडा (अमेरिका) येथे होणार आहे. 10 चौकार आणि चार षटकारांची स्फोटक खेळी खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला पहिल्याच षटकात क्रीझवर यावे लागले. कारण नवोदित यशस्वी जैस्वालने पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन चेंडूंत केवळ एक धाव घेतली. सहा धावांवर या धक्क्‌‍यानंतर शुभमन गिल (6) ही स्वस्तात बाद झाला. येथून सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी 34 धावांनी धावसंख्या 121 पर्यंत नेली. दोघांमध्ये मॅच विनिंग पार्टनरशिप होती.

याआधी द्विपक्षीय टी- 20 मालिकेत भारतीय संघ 13 वेळा करो या मरोच्या परिस्थितीत अडकली होता. म्हणजेच मालिका वाचवण्यासाठी तो सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता. मागील 13 सामन्यांपैकी संघाने 11 सामने जिंकले होते, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील करो या मरोच्या सामन्यातच भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता येथेही विजय मिळाला आहे. तत्पूर्वी, ब्रँडन किंग आणि मायर्स यांनी पॉवर प्लेमध्ये 38 धावा केल्यामुळे वेस्ट इंडिजने सातव्या षटकात 50 धावा केल्या. ऑगस्ट 2022 नंतर टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या सलामीच्या जोडीने 50 हून अधिक धावांची भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ होती. अक्षरने पुढच्याच षटकात मायर्सला बाद करत 55 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

पाऊस, खराब प्रकाश, खराब मैदान ही कारणे अनेकवेळा सामना उशिरा सुरू होण्यास कारणीभूत आहेत, परंतु या सामन्याला उशीर होण्याचे कारण कदाचित सर्वात विचित्र होते. नाणेफेकीनंतर भारतीय संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी वेळेत मैदानावर आला. त्यानंतर अचानक खेळाडू मैदान सोडू लागले. तोपर्यंत 30 यार्ड सर्कलची रेषा काढण्यात आली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्तुळ तयार करून सामना सुरू करण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना उशिरा सुरू होण्याच्या या कारणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कुलदीप यादवने रचला इतिहास
कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 4 षटकात 28 धावा दिल्या. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या 3 फलंदाजांना आपल्या गळाला लावले. यासह त्याने 50 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्सही पूर्ण केल्या. कुलदीपने 30 सामन्यांच्या 29 डावांमध्ये 14.28 च्या सरासरीने आणि 6.47 च्या इकॉनॉमीने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या. या दरम्यान कुलदीपने युजवेंद्र चहलचा विक्रम मोडला. चहलने 34 सामन्यांत 50 बळी घेतले होते.

50 बळी घेणारे खेळाडू
कुलदीप यादवपूर्वी युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावावर सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रम होता. चहलने 34 सामन्यात 50 तर बुमराहने 41 सामन्यात 50 बळी पूर्ण केले. त्याचबरोबर अश्विनने 42 आणि भुवनेश्वर कुमारने 50 सामन्यांमध्ये हा टप्पा पार केला होता. युजवेंद्र चहल हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे. दुसरीकडे, त्याचबरोबर सर्वात कमी चेंडूत 50 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Exit mobile version