नेरळ स्थानकातील लाकडी छप्पर दिसेनासे होणार
। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या इतिहासात सर्वात आधी मुंबई ते ठाणे गाडी धावली. त्यानंतर तीन वर्षांनी खोपोलीपर्यंत ट्रेन पोहचली. त्यात नेरळ स्थानक ब्रिटिश काळात तयार झाले. त्यावेळी ब्रिटिशांनी उभारलेले सागवान लाकडी आणि दगडी बांधकाम असलेले स्थानक हेरिएटज म्हणून नोंद झाले होते. नेरळ स्थानकातील ते हेरिटेज बांधकाम हे नेरळ जंक्शन स्थानकाची शान होते. मात्र तेच लाकडी आणि दगडाने तयार झालेले निवारा शेड आणि कार्यालयाची इमारत आता तोडली जात आहे. ब्रिटिशांनी आपल्या दफ्तरी ग्रेट ब्रिटनमध्ये नोंदलेले हे बांधकाम काही दिवसांनी दिसेनासे होणार असल्याने ब्रिटिश काळातील वास्तू नजरेआड होणार आहेत.
नेरळ हे स्थानक ब्रिटिश काळात १८५६ मध्ये अस्तित्वात आल्याच्या नोंदी आहेत. पूर्वी स्थानकाची निर्मिती झाली, त्यावेळी नेरळ स्थानक हे सध्याच्या स्थानाच्या मुंबई दिशेकडे मालधक्का येथे होते. कालांतराने नेरळ-माथेरान-नेरळ मार्ग १९०७ मध्ये बनवण्यास सुरुवात झाली. त्यावेळी नेरळ स्थानक जंक्शन स्थानक बनले. तेंव्हापासून नेरळ स्थानकात सागवान लाकडे वापरून बनवलेले दगडी बांधकाम हि हेरिटेज वास्तूची साक्ष देत होते. पूर्वी गाडीला पुढे जाण्याचा इशारा देणारी सिग्नल यंत्रणा म्हणून स्थानकांच्या मध्ये लोखंडी किंवा पितळेची घंटा काम करायची. अशी घंटा नेरळ स्थानकाच्या फलाट एक आणि दोनवर होती. काही वर्षांपूर्वी नेरळ स्थानकातील या पितळेची घंटा दिसेनाशा झाल्या असून फलाट एकवरील स्थानकाचे महत्व असलेली निवारा शेड पाडून टाकली आहे. त्यांनतर आता फलाट दोनवरील मोठी हेरिटेज वास्तू जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. नेरळ स्थानकाचा मेकओव्हर करण्याचे कार्य मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून सुरु असून त्या बांधकामात नेरळ स्थानकातील जुने बांधकाम तोडून टाकण्याचा धडाका मध्य रेल्वेकडून सुरु आहे.
मात्र नवीन पद्धतीने स्थानकाचा कायापालट केला जात आहे. त्यात नेरळ स्थानकातील हेरिटेज बांधकाम तोडण्यात आले आहे आणि आता स्थानकातील मोठे बांधकाम तोडण्यात येत असताना कोणत्याही प्रकारची परवानगी ग्रेट ब्रिटनमधून घेण्यात आलेली नाही, अशी चर्चा सुरु आहे. या हेरिटेज वास्तुवर राज्य हेरिटेज कमिटीचा देखील अधिकार आहे. त्यामुळे नेरळ स्थानकातील हेरिटेज वास्तूची झालेली तोडफोड याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
