धक्कादायक! भूमिगत वीज वाहिनी कामात गडबड

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण कार्यक्रमांतर्गत अलिबाग शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. या कामासाठी जुन्या उच्चदाब वाहिन्यांचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ब्राह्मण आळी परिसरात इन्शुलेशन खराब झालेली उच्च दाब वाहिनी टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

राष्ट्रीय आपत्ती धोके निवारण कार्यक्रमांतर्गत अलिबाग शहर आणि लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. लिना पॉवरटेक कंत्राटदार कंपनीकडून हे काम केले जात आहे. सप्टेंबर 22 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उर्वरित काम घाईगडबडीत उरकण्यावर ठेकेदार कंपनीने भर दिला आहे. मशिन ड्रिलींगच्या साह्याने हे काम होणे अपेक्षित असताना शहरातील रस्ते दुतर्फा खोदून उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्या टाकल्या जात आहेत. या वाहिन्या 0.8 ते 1.2 मीटर खोलीवर टाकणे अपेक्षित असताना एक ते दीड फुटांवरच टाकल्या जात आहेत. कहर म्हणजे, आता उर्वरित कामासाठी जुन्या उच्च दाब वाहिनीचा वापर केला जात असल्याची बाब समोर आली आहे.

ब्राह्मण आळी येथे राम मंदिर ते अथर्व रेसिडन्सि परिसरात उच्चदाब वाहिनी टाकण्याचे काम सुरु होते. यावेळी इन्शुलेशन खराब झालेली उच्चदाब वाहिनी टाकण्यासाठी आणण्यात आली होती. स्थानिकांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबविण्यात आले आहे. आता नवीन केबल आणून हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेने मान्य केले आहे. याबाबत महावितरणचे अभियंता मुंडे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी ही उच्चदाब वाहिनी थळ वायशेत येथून काढून आणली असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

केबलचे इन्शुलेशन खराब झाले असले तरी उच्चदाब वाहिनी खराब झालेली नाही. ठेकेदारकडील उच्च दाब वाहिन्या संपल्या असल्याने थळ वायशेत काढून आणलेली केबल टाकली जात होती. सध्या आम्ही हे काम थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.

महादेव मुंडे, प्रकल्प अभियंता महावितरण, अलिबाग विभाग

Exit mobile version