जिल्ह्यातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
प्रतिमाणसी 55 लिटर पाणी मिळावे या उद्देशाने केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली. मात्र, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या या योजनेतील अनेक कामे अद्याप अपूर्णच आहेत. तब्बल 607 योजना रखडलेल्या असून, 106 कोटी रुपयांच्या निधीअभावी कामे थांबलेली आहेत. त्यामुळे प्रतिमाणसी 55 लीटर पाण्याचा दावा केवळ दिखावा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.
‘हर घर जल’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जलजीवन योजनेची अंमलबजावणी गावागावात करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर सोपविण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर या योजनेसाठी कामे हाती घेण्यात आली. कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून विविध ठेकेदारांना कामे देण्यात आली. अनेक ठिकाणी विहिरी बांधणे, रस्त्यांच्या कडेला खड्डे करून मोठ्या पाईपलाइन टाकणे, घराघरात नळ कनेक्शन देणे अशी कामे पूर्ण झाली. या योजनेमुळे घराघरात पाणी पोहोचेल आणि रायगड टँकरमुक्त जिल्हा बनेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहिली असून, पाण्याचा थेंबही मिळत नाही. बांधलेल्या विहिरी, टाक्या आणि संरचना निष्क्रिय पडून आहेत. काही ठिकाणी तर विहिरींचे कठडे आणि पाण्याच्या टाक्यांनाही तडे गेले आहेत.
जलजीवन मिशनमुळे सर्वांना मुबलक पाणी मिळणार, असा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, आजही “जलजीवनच्या आडात पाणीच नाही” अशी स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारीपासूनच जिल्ह्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, अनेक गावांमध्ये पाणीकपात सुरू आहे. काही ठिकाणी एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, तर काही गावांमध्ये पंधरा-पंधरा दिवस नागरिकांना पाण्याची वाट पाहावी लागत आहे.
जिल्ह्यात एकूण 1,496 जलजीवन योजना राबविण्यात आल्या. त्यापैकी 889 योजना पूर्ण झाल्या असून, 615 योजना गावांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. तरीही 607 योजना अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. म्हणजेच, एकूण कामांपैकी सुमारे 60 टक्केच पूर्ण झाली असून, उर्वरित 40 टक्के कामे प्रलंबित आहेत. अपूर्ण योजनांपैकी 16 योजनांची फक्त 25 टक्के, 134 योजनांची 50 टक्के, 282 योजनांची 75 टक्के आणि 169 योजनांची 95 टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, निधीअभावी उर्वरित कामे थांबली असून, 106 कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे.
निधीअभावी कामे रखडल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. नळ कनेक्शनचे पाईप तुटणे, पाण्याच्या टाक्यांना तडे जाणे, अपूर्ण संरचना खराब होणे, अशा समस्या वाढल्या आहेत. याकडे जिल्हा परिषद प्रशासन कितपत लक्ष देणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पाणी मिळण्याच्या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा वाढत असून, जिल्ह्यातील अनेक भागांत “पाण्याविना जनजीवन” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
