| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील आसुडगावाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. रोहित जमुना यादव (20) असे या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला 679 ग्रॅम वजनाचा 13,580 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा त्याने कुठून आणला याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी रोहित यादव हा आसुडगावात राहण्यास असून, तो आसुडगाव येथील देशी तडका हॉटेलजवळ गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आला होता. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे व त्यांचे पथक आसुडगाव येथे पेट्रोलिंग करत आले होते. यावेळी त्या भागात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या आरोपी रोहित यादव याला पोलिसांनी हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्याच्या बॅगेमध्ये 679 ग्रॅम वजनाचा 13,580 रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ आढळून आला. सदर गांजाबाबत त्याच्याकडे अधीक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर रोहित यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.