। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी येथे पाताळगंगा नदीवरील बंधाऱ्यावर एक तरुण पोहायला गेला असता तो बुडाल्याची घटना गुरुवारी (दि. 28) सांयकाळी घडली. संचित नावाचा एक परप्रांतीय कामगार तरुण एमआयडीसी टाकी जवळच्या पाताळगंगा नदीपात्राच्या बंधाऱ्यावर पोहायला गेला होता. पोहत असताना त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. अंधार पडल्याने स्थानिक व रसायनी पोलिसांना त्याचा शोध घेण्यास अडचणी आल्या. रसायनी पोलिसांनी याबाबत हेल्प फाउंडेशनची मदत मागितली. शुक्रवारी (दि.29) सकाळी हेल्प फाउंडेशनच्या टीमने पाताळगंगा नदीत सर्च ऑपरेशन करून त्याचा मृतदेह शोधून बाहेर काढला. मृतदेहाचे चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत 29 वर्षीय तरुण संचित हा मुळचा सरस्वती, उत्तरप्रदेश येथील असल्याचे समजते. अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Patalganga River Drowning: पाताळगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
