। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत जवळील पळसदरी येथे पिकनिक साठी आलेल्या 18 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 21) दुपारी पळसदरी रेल्वे तलावाच्या पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमला सापडला.
कर्जत तालुक्यातील पळसदरी धरणामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा आज मृतदेह सापडला. नवी मुंबई येथील घणसोली भागात राहणारा आर्यन थापर हा भारतीय विद्यापीठात बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टनिमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह धरण परिसरात गेला. आर्यनला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला. दोन वेळा पोहत जाऊन तो सुरक्षित परतही आला. मात्र, तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणातच नजरेआड झाला. मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली.
आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली असता रेस्क्यू टीमला यश आले आणि आर्यनचा मृतदेह डॅममधून बाहेर काढण्यात आला. अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली व परिस्थितीची माहिती नसताना पोहण्यासाठी उतरणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस पाटील विनया खोपकर, डेला एडवेंचरचे गणेश गीध आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पळसदरी धरणात नवी मुंबई येथील तरुणाचा बुडून मृत्यू
