| नेरळ | प्रतिनिधी |
मूळचा ओडिशा राज्यातील असलेला श्रीकांत साहू हा तरुण मुंबईमधील दादर भागात नोकरीनिमित्त राहतो. हा तरुण भीमाशंकर येथील भगवान शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी घरातून निघाला. भीमाशंकर अभयारण्यातून यापूर्वी देखील या तरूणाने प्रवास केला होता. त्यामुळे तो सकाळी खांडस गावातून भीमाशंकर अभयारण्य मधून जाण्यास निघाला. सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्या तरुणाने ऐनकर यांच्याशी संपर्क साधून आपण रस्ता चुकलो आहोत, अशी माहिती दिली. त्यानंतर खांडस गावातील निवृत्ती ऐनकर यांनी येथील सामाजिक कार्यकर्त्यांना संपर्क केला. त्यातून खोपोली येथील हेल्प फाऊंडेशनकडून गुरुनाथ साठलेकर यांच्याशी निवृत्ती ऐनकर यांच्याशी संपर्क करून देण्यात आला.
भीमाशंकर अभयारण्यात भरकटलेल्या श्रीकांत साहू या तरुणाने आपले शेवटचे लोकेशन ऐनकर यांना पाठवले होते. त्या लोकेशननुसार हेल्प फाऊंडेशनकडून मार्गदर्शन घेऊन निवृत्ती ऐनकर तसेच खांडस गावातील रवी ऐनकर, खांडस परिसरातील तेजश वाघमारे, प्रदीप वाघमारे, सोमनाथ गोसावी यांनी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी 1.00 वाजता खांडस येथून भिमाशंकर घाट चढण्यास सुरुवात केल्यानंतर अर्धा डोंगर चढून गेल्यावर खांडस भागातील तरुणांना बैलघाट भागात काही अंतरावर पडून राहिलेला दिसून आला. त्यावेळी डोंगर उतरवून घरंगळत आल्याने श्रीकांत साहू या ट्रेकर्सच्या अंगावर काही जखमा झाल्या होत्या. त्यानंतर या ग्रामस्थांनी श्रीकांत साहू याला संध्याकाळी 4 वाजता खांडस येथे सुखरूप आणले.







