| पनवेल | वार्ताहर |
सोशल मीडियावर नोकरी शोधणे कामोठे शहरातील एका तरुणीला तब्बल 3 लाख 57 लाखाला पडले आहे. या नोकरीच्या शोधात तिने लाखो रुपये गमावले आहेत. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे येथे राहणारी एक गृहिणी असून, घरातील काम करताना वेळ जावा म्हणून ती गेल्या काही दिवसापासून वर्क फॉर्म होम नोकरीच्या शोधात होती. ही नोकरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शोधत होती. मात्र, हेच सोशल मिडिया योगितासाठी चांगले महागात पडले आहे. तीने स्वतः च्या फेसबुक खात्यावर वर्क फॉर्म होमची जाहिरात पाहिली होती. ती जाहिरात पहिल्या नंतर, तीने त्या जाहिरातीची लिंक ओपन केल्या नंतर तिला जॉब प्रोफाईल आला. त्यानुसार तिने सगळी माहिती त्यात भरली. ती माहिती भरल्यानंतर, तिला व्हिडीओ लाईक करून त्या व्हिडिओचे स्क्रिन शॉट पाठविण्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार तीने ते व्हिडीओ पाहून लाईक करून त्याचे स्क्रीन शॉट पाठवले आणि अवघ्या काही तासातच याचा मोबदला म्हणून तीला 120 रुपये मिळाले. हे 120 रुपये प्राप्त झाल्या नंतर, सोशल मिडियावरील व्यक्ती देत असलेली कामे ती करू लागली. त्या बदल्यात तिला अनुक्रमे 200 हून अधिक पैसे मिळत गेले. त्यानंतर तिला एक टास्क देण्यात आला, त्या टास्कमध्ये ऑनलाइन ट्रेडिंगची माहिती दिली. त्या ट्रेडिंगमध्ये तिने गुंतवलेल्या 1 हजारांच्या मोबदल्यात तिला 1 हजार 300 रुपयाचा नफा झालेला मोबदला दाखवण्यात आला. हे पाहून तीने, समोरील व्यक्तीने ट्रेडिंगच्या नावाखाली दिल्या वेगवगेळ्या खात्यात 3 लाख 57 हजार रुपये पाठवले. ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या या रकमेचा मोबदला म्हणून तिला 4 लाख 80 हजाराचा नफा दिसून आला. नफा दिसून आल्यानंतर तिने ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रक्कम काही केल्या खात्यावरून निघत नव्हती, याचे कारण विचारल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी आहे. असे कारण सांगून अधिक रक्कम भरल्यानंतर ही रक्कम मिळेल अशी माहिती दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तीने त्याबाबत कामोठे सायबर सेलला पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.