। कल्याण । प्रतिनिधी ।
भुवनेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेल्या एका तरुणकडे तीन किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
भुवनेश्वर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना तिकीट तपासणीसाने एका प्रवाशाला प्रवासाचे तिकीट विचारले. त्यांच्याजवळ तिकीट नव्हते. तपासणीसाने त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. अंबरनाथ रेल्वे स्थानक आल्यानंतर या तरूणाला कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांच्या ताब्यात दिले. जवानांना या प्रवाशाचा संशय आला. त्यांनी त्याची झडती घेतली असता या प्रवाशाजवळ तीन किलो गांजा आढळून आला. एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करत हा प्रवासी धाडसाने एक्सप्रेसमधून अंमली पदार्थ घेऊन प्रवास करत होता. कल्याण रेल्वे स्थानकात या प्रवाशाला अंमली पदार्थासह उतरविण्यात आले आणि त्याला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेले. तरुणाची चौकशी केली असता तो रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. रेल्वे तिकीट तपासणीसाच्या तत्परतेमुळे हा प्रवासी रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रवाशाची पोलिसांनी त्यांनी गांजा कोठुन आणला. हा गांजा ते कोणाला विक्री करणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, या प्रवाशाच्या चौकशीतून गांजा तस्करांची टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.