| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
खारघर येथील पांडवकडा धबधब्यात व्यक्ती बुडाल्याची वर्दी मिळताच सिडको अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत थरारक बचावकार्य केले. जोरदार पाऊस आणि धबधब्यातून मोठ्या प्रमाणात पाणी कोसळत असतानाही जवानांनी सुमारे 10 ते 12 फुट खोल दगडाच्या कपारीत अडकलेल्या तरुणाचा शोध घेत त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. आदित्य विश्वकर्मा (23) असे या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर गुरूवारी (दि.13) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास अग्निशमन केंद्राला एक व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फायर जीपसह जवान घटनास्थळी दाखल झाले. धबधब्यात पाण्याचा वेग मोठा असल्याने सुरुवातीला दोरीच्या साहाय्याने शोध घेण्यात आला. मात्र, बुडालेली व्यक्ती आढळून आली नाही. त्यानंतर अग्निशमन जवानांनी पाण्यात उतरून परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी एका दगडाच्या कपारीत अंदाजे 10 ते 12 फूट खोलवर एक तरुण आढळून आला. जवानांनी त्याला शिताफीने पाण्याबाहेर काढून स्ट्रेचरवर ठेवले. त्यानंतर डोंगराच्या खाली आणून घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेतून त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या बचावकार्यात अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, फायरमन सूरज पाटील, प्रीतम पाटील, चेतन पवार आणि कौस्तुभ वायदंडे यांनी सहभाग घेतला. तसेच, यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते.
पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा बचाव
