| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील वि. के. हायस्कूल तसेच वडाळे तलाव परिसरात विद्यार्थिनी, विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने अलीकडे या परिसरात काही असामाजिक प्रवृत्तीच्या व्यक्तींची हालचाल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषतः शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत गर्दी वाढत असून, परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवती सेना पनवेल शहर चिटणीस धनश्री भगत, राजोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. परिसरातील वाढत्या हुल्लडबाजी, छेडछाड, महिला सुरक्षा यांसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.






