। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानच्या डोंगर रांगेत असलेल्या गार्बेट प्लाटून येथे ट्रेकिंगसाठी आलेले तीन ट्रेकर्स रस्ता भरकटले होते. त्याबाबत माहिती पोलीस हेल्पलाईन यांना मिळाली असता नेरळ पोलिसांनी हेल्प फाउंडेशनच्या मदत घेतली. दरम्यान चिंचवाडी येथील दोन आदिवासी तरुण रात्री जंगलात पोहचले आणि त्यांनी त्या तीन ट्रेकर्स यांना शोधून डिकसळ येथे सुखरूप आणले.
मुंबई शिव परिसरातील तरुण कर्जत येथे ट्रेकिंगसाठी निघाले होते. माथेरान डोंगर रांगेत असलेल्या गार्बेट प्लाटून येथे जाण्यासाठी ते तीन तरुण डिकसळला पोहोचले. दीपक वागवे, कोरक सिंह, राघवेंद्र त्रिपाठी हे गार्बेट प्लाटून येथे जाण्यासाठी पाली- भूतिवली धरणाच्या बाजूने चिंचवाडी सागाची वाडी असे पुढे धामणदांड येथून पुढे जात होते. गार्बेट प्लाटून येथे दिवसभर फिरून हे तरुण आपल्या घरी परतण्यासाठी निघाले असता त्यांना वाट सापडली नाही. गवत वाढल्याने ट्रेकर्स यांना रस्ते सापडत नव्हते, शेवटी रस्ता भरकटलेले हे तरुण अंधार पडू लागल्याने घाबरले. त्या तरुणांनी पोलिसांना हेल्प लाईनवर संपर्क केला. त्यामुळे पोलिसांपुढे रात्रीच्या अंधाराचे संकट होते, तरीदेखील नेरळ पोलीस डिकसळ येथे जाण्यास निघाले. त्याचवेळी प्रभारी पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी ट्रेकर्स यांचा शोध लावण्यासाठी खोपोली येथील हेल्प फाउंडेशनकडे मदत मागितली. हेल्प फाउंडेशनकडून तत्काळ स्थानिक दोन आदिवासी यांना मदतीसाठी पाठवण्यात आले.
डिकसळ येथील आदिवासी तरूण सुरेश पारधी आणि संदीप निरगुडे यांनी मध्यरात्री गार्बेट प्लाटून परिसरातून परतताना वाट चुकलेल्या ट्रेकर्स यांना शोधले. त्यांना सोबत असलेले पाणी ,बिस्कीट देऊन त्यांना घाबरू नका असा सल्ला दिला. शेवटी त्या तिन्ही ट्रेकर्स यांना रात्रीच्या अंधारात आणि पाऊस बरसत असताना डिकसळ येथे सुखरूप आणले. त्यावेळी त्या ट्रेकर्स यांनी हेल्प फाउंडेशन आणि सुरेश पारधी, संदीप निरगुडे यांचे आभार मानले.






