गट विकास अधिकार्यांची घेतली भेट
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विविध विषयांसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या युवा सेना पनवेल तालुका अधिकारी मनोज कुंभारकर यांनी युवा सेना शिष्टमंडळासह पनवेल पंचायत समिती गटविकास अधिकारी वाटोरकर यांची भेट घेतली.
यावेळी युवा सेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, विधानसभा समन्वयक अरविंद कडव, ग्रामीण तालुका चिटणीस अजय पाटील, महानगर चिटणीस जीवन पाटील, नवीन पनवेल शहर चिटणीस सृजन जोशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना युवा सेना पनवेल तालुका अधिकारी मनोज कुंभारकर यांनी सांगितले की, अंगणवाडी तसेच गरोदर माताना देण्यात येणार्या पोषक अन्नाच्या सामानाची वितरणापूर्वीच योग्य तपासणी व्हावी. तपासणी शिवाय अन्न वितरणासाठी पुढे पाठविण्यात येऊ नये अशी विनंती वजा सूचना गटविकास अधिकार्यांना केली. त्यावर अधिकार्यांनी सदर विषयाबाबत संबंधित कंत्राटदाराला पत्र लिहून सूचना करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे गणवेश वितरणासंदर्भातील सर्व अधिकार शासनाने गाव पातळीवरील शाळा समित्यांना प्रदान केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या महिन्यातच दोन्ही गणवेश (चांगल्या दर्जाचे आणि 100 टक्के पॉलिस्टर नसलेले कापड) आणि त्याचसोबत गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य मिळेल याची पूर्णत: तजवीज करण्याबाबत विनंती केली. यावर अधिकार्यांनी संबंधीत शाळा समित्यांना अधिसूचना काढण्याच्या सूचना संबंधित खात्याला केल्या.







