| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील सर्पदंश व विंचूदंशाने होणार्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रभावी मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आरोग्य विभागामार्फत आयोजित कार्यशाळेमध्ये दिल्या.
जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रायगड यांच्या माध्यमातून आयोजित सर्पदंश, विंचूदंश व अतिजोखमीच्या गरोदर माता निदान व उपचार कार्यशाळेप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. शहरी व ग्रामीण भागात सर्पदंश, विंचूदंशाच्या रुग्णांकरिता आवश्यक औषधे व अन्य सामुग्री वेळोवेळी उपलब्ध करण्यावर भर देऊन सर्व वैद्यकीय अधिकारी व यंत्रणेला वारंवार याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याबाबत घ्यावयाच्या काळजीसंदर्भात व प्रथमोपचाराबाबत तसेच अंधश्रद्धा न बाळगता रुग्णालयात उपचार करण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी रा.जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पद्मश्री पुरस्कार्थी डॉ. हिम्मतराव बावस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नितीन बावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रा.जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचे कौतुक करताना जिल्ह्यात अनेक प्रकारच्या विंचू दंशावर उपचार करून नागरिकांना जीवदान दिल्याने शासनाने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. त्यांच्या माध्यमातून लाभणारे मार्गदर्शन हे सर्वच वैद्यकीय अधिकार्यांना सेवा देताना लाभदायक ठरणार आहे असे म्हणाले. रायगड जिल्ह्यातील सर्पदंश व विंचूदंशाची समस्या लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत वेळेत व योग्य उपचार रुग्णास लाभणे या अनुषंगाने सदर कार्यशाळा जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी आयोजित केली होती.
ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत असताना सर्पदंश व विंचूदंशाच्या अनेक रुग्ण येत असतात त्यांचे निदान करून उपचार कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन पद्मश्री पुरस्कार्थी डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी केले. सर्पदंश व विंचूदंश होऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी, उपचाराची पद्धती, अद्ययावत औषधे व तपासण्या याबाबत मार्गदर्शन करून कार्यशाळेस उपस्थित वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. तसेच याप्रसंगी डॉ.बावस्कर यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील महाड, पोलादपूर सहित महाराष्ट्रामध्ये केलेल्या उपचाराचे दाखले दिले. लंडन व इतर देशातील जनरल मध्ये त्यांनी केलेल्या 16 प्रकारच्या संशोधनाच्या प्रसिद्धीबाबत माहित दिली.
या कार्यशाळेमध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुजाता सावंत यांनी अतिजोखमीच्या गरोदर मातांचे निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. अतिजोखमीच्या माता कशा ओळखाव्यात, त्यांना कोणते उपचार द्यावेत, त्यांच्या प्रसूती दरम्यान येणारी गुंतागुंत कशी टाळावी, वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती, अतिजोखमीच्या मातांना संदर्भित करत असताना घ्यावायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या प्रश्नांना डॉ. सावंत यांनी समाधानकारक उत्तरे दिली, तसेच या विषयाला पुढे नेत रुग्णांना संदर्भित करताना घ्यायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी केले. आरोग्य विभागामार्फत आयोजित कार्यशाळेचे प्रास्ताविक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके यांनी केले. सदर कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चेतना पाटील, जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील, प्रथमेश मोकल, रुपेश म्हात्रे, गणेश भोसले, प्रतीम सुतार तसेच जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकारी व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.