| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषद सरसावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत रुग्णांना तीन महिन्यांचा आवश्यक औषधांचा एनसीडी कीट मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सोमवार (दि.31) पासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील उच्च रक्तदाब 34,047 तर 21,399 मधुमेह असे एकूण रुग्णांना एनसीडी कीट उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्ह्याची लोकसंख्या 26 लाख 34 हजार 200 आहे. रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागात 55 प्राथमिक आरोग्य केंद्र, 280 उपकेंद्र, 7 जिल्हा परिषद दवाखाने, 3 प्राथमिक आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उच्चरक्तदाब, मधुमेह आजारावरील औषधे देण्यात येतात. उपलब्धतेनुसार, रुग्णांना औषधे देण्यात येत असल्याने ही औषधे संपल्यानंतर दुर्गम भागातील काही रुग्णांना सतत आरोग्य केंद्रात येऊन औषधे नेणे अडचणीचे ठरते. यामुळे हे रुग्ण औषधांपासून वंचित राहून त्यांना इतर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातून नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत उच्चरक्तदाब, मधुमेह रुग्णांना एका वेळी तीन महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील उच्च रक्तदाबाच्या 34,047, तर मधुमेहाचे 21,399 रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रुग्णांना औषधांचे कीट सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.