| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रेवस मार्गावरील चोंढी नाका येथे शुक्रवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातमध्ये वयोवृध्द पादचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याने भरलेला टँकर घेऊन चालक अलिबाग-रेवस मार्गावरून जात होता. चोंढी नाका येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आल्यावर त्या टँकरची एका कारला धडक लागली. या धडकेत रस्त्यावरून जाणाऱ्या वयोवृध्द पादचाऱ्याला कारची जोरदार धडक लागली. यामध्ये पादचारी गंभीर जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली. यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, मांडवा पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली.






