महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड; राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व!
| उरण | प्रतिनिधी |
उरणमधील तब्बल आठ खेळाडूंनी महाराष्ट्र आईस हॉकी संघात स्थान मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून, ते उत्तराखंडमधील देहरादून येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
आईस हॉकीसारख्या प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या आणि विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या खेळात उरणसारख्या किनारपट्टीच्या भागातून खेळाडू तयार होणे ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे. 12 वर्षांखालील गटात वरदा आसरकर, शिवांश तांडेल, 15 वर्षांखालील गटात अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील, 18 वर्षांखालील गटात सुरज करण, सीनियर गर्ल्स गटात स्नेहा शेळके, शर्वणी या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या खेळाडूंच्या यशामागे श्री स्केटिंग अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. बर्फावर खेळल्या जाणाऱ्या या अत्यंत वेगवान आणि रोमांचक खेळात शारीरिक तंदुरुस्ती, विवेक संतुलन आणि चपळ निर्णयक्षमतेची गरज असते. महाराष्ट्रात स्केटिंगच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार वेगाने वाढत आहे. या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करावी आणि उरणच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरा रोवावा अशी अपेक्षा विश्वस्त आणि क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.







