| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरात विकासकामांचा गाजावाजा होत असताना त्या विकासाच्या पायाभरणीत घाम गाळणाऱ्या गोरगरीब कामगारांचे जीव मात्र कवडीमोल ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. उरण शहरात विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करताना अनेक परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असतानाही त्यांची अधिकृत नोंद पोलीस दप्तरी नसल्याची बाब समोर आल्याने प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरण नगरपालिकेच्या विविध विकासकामांचा ठेका एका विशिष्ट ठेकेदाराकडे असून, त्याच्या कामांदरम्यान अनेक वेळा कामगार अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी टाऊन हॉलच्या बांधकामस्थळी काम करणारा झारखंड येथील विजय तुरी (38) हा कामगार उंचावरून पडून गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेची पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी समाजमंदिर आणि क्रीडा संकुलाच्या बांधकामावेळीही परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनांचीही अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कामगारांच्या मृत्यूंची प्रकरणे जाणीवपूर्वक दडपली जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कमी वेतनात काम करणारे परप्रांतीय कामगार सहज उपलब्ध होत असल्याने त्यांनाच प्राधान्य दिले जाते. अपघात घडल्यास आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटविणे सोपे जाते, अशीही चर्चा कामगार आणि नागरिकांमध्ये सुरू आहे. सलग घडलेल्या घटनांमुळे या चर्चेला अधिक बळ मिळत आहे.







