| कर्जत | प्रतिनिधी |
परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सर्वोच्च स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्था पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी कर्जत तालुका विद्यार्थी व पालक मंचाच्यावतीने भारताच्या राष्ट्रपतींना कर्जतच्या तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, परीक्षा पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण व असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे, असे नमुद करण्यात आले आहे. हे निवेदन देताना ॲड. कैलास मोरे, राजाभाऊ कोठारी, उमेश गायकवाड, मालू निरगुडा, रमेश कदम, आरती भोईर, स्वीटी बार्शी, ॲड. क्रांती अभंगे, ॲड. राजेंद्र निगुटकर यांच्यासह कर्जतमधील अनेक पक्ष, संघटना, संस्थाचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार तसेच सर्व स्तरातील नागरीक उपस्थित होते.







