। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर प्रभातनगर येथे दुचाकी आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात कारचालकासह दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी (दि.15) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलादपूर येथे आठ दिवसांपूर्वी स्कायवॉकसाठी गर्डर बसविताना पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम येथे सर्व्हिस रोडवरील वाहनांना मुंबईकडे जाण्यासाठी डिव्हायडर कापून रस्ता देण्यात आला. मात्र, संबंधित राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून पुन्हा या ठिकाणी डिव्हायडर बसवून सर्व्हिस रोडवरील वाहनांना महामार्गावर येण्यास मज्जाव न केल्याने याठिकाणी वाहनांची ये-जा सुरू होती. त्यामुळे हा अपघात घडला.
या अपघातात दुचाकीस्वाराचा पाय मोडला. तर कारची एअर बॅग उघडल्याने कारचालकाच्या उजव्या कानाला जोरदार फटका बसून गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती मिळतात काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर, स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.






