पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनींचे पूजन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी (दि.29) वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पतीच्या दीर्घायुष्यासाठी असंख्य सुवासिनींनी एकत्र येत वडाच्या झाडाचे पूजन केले. औक्षण करून, नैवेद्य दाखवून असंख्य महिलांनी वडाच्या झाडाला सूत बांधून, सात जन्माची गाठ मजबूत ठेवण्याचे साकडे घातले. यावेळी सकाळच्या सुमारास वडाच्या झाडाजवळ महिलांची अलोट गर्दी झाली होती.
वटपौर्णिमेनिमित्त सोमवारी सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू झाली होती. साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. आंबे, केळी, फुले, हळद-कुंकू साहित्याने वडाची पूजा करत सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती लाभो, अशी प्रार्थना केली. यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून आंब्याचे वाण दिले. काही महिलांनी परंपरेपरेनुसार वडाच्या झाडाचे पूजन केल्यानंतर वृक्षारोपणाचे महत्त्वही स्पष्ट केले. यावेळी अनेकांनी वृक्षारोपणातून “झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
आख्यायिकेनुसार, सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्यात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विशेष म्हणजे, पावसानेही सकाळपासून हजेरी लावली होती. मात्र, त्याचा विचार न करता, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटवृक्षाच्या पूजनासाठी घराबाहेर पडल्या. ज्येष्ठ महिलांसह नव्या पिढीतील सुवासिनींसोबत नववविवाहितांनीदेखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे केले. त्यामुळे पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
वटपौर्णिमा या सणाच्या निमित्ताने सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वडाच्या भव्य झाडाची सुरक्षा पूर्वापार चालत आली आहे. झाडाची “पूजा करा, झाडे तोडू नका” असा संदेशही व्रतातून दिला जातो. मात्र, अनेकांनी बाजारातून किंवा झाड असेल त्या ठिकाणाहून वडाच्या फांद्या आणून त्याला तुळशीत रोवून पूजा केली. काही ठिकाणी झाड लावून वटसावित्रीची पूजा अनोख्या पद्धतीने केली.







