| पनवेल | प्रतिनिधी |
जून महिना सुरू होताच शाळांच्या नव्या शैक्षणिक वर्षाचे वेध लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे राज्यातील अनेक मराठी माध्यमांच्या शाळा 26 जूनच्या आसपास सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक सीबीएसई माध्यमांच्या शाळांनी सहावी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत.
नवीन पनवेलमधील शाळांच्या प्रवेशद्वारांवर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी “Welcome Back to School” असे आकर्षक फलक लावण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीनंतर तब्बल एक महिन्याने शाळेत परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. मित्र-मैत्रिणींशी पुन्हा भेट होणार, शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता होती. शाळा परिसरात गप्पा, हास्यविनोद आणि नव्या संकल्पांची चर्चा रंगलेली दिसून आली. शिक्षक व शाळा प्रशासनानेही विद्यार्थ्यांचे स्वागत करत नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी परिसरात उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीने विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेद आणि नव्या ध्येयांची प्रेरणा जागृत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.







