| रसायनी | प्रतिनिधी |
जन शिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून रविवारी (दि.26) विणेगाव-खालापूर येथे आरी वर्क हस्तकला कार्यशाळा व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली. तसेच, प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले.
रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून दि.15 ते 31 जुलै या 15 दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता पखवाडा उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती संचालक डॉ. विजय कोकणे यांनी दिली आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य सक्रिय पणे सुरु असून, आतापर्यंत 80 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून विणेगाव-खालापूर येथे आरी वर्क हस्तकला कार्यशाळा व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाप्रसंगी कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे, बचतगट पूजा गरुडे, प्रशिक्षिका स्वप्नाली म्हात्रे, सिद्धी साळुंके व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.







