। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
जानेवारीच्या सुरुवातीला असंख्य नागरिकांना वेड लागते ते पतंगांचे. मकरसंक्रांतीच्या निमित्तााने आकाशात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवताना दिसून येतात. मकरसंक्रांतीला तीळगुळाबरोबरच पतंगांचे वैशिष्ट्य मानले जाते. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील बाजारात पतंग विक्रीसाठी दाखल झाले असून पतंग खरेदीची लगबगही सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा होत असतानाच या पतंगांसाठी वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतणारा ठरतो. पतंग कापाकापीच्या स्पर्धेमध्ये आपण जिंकावे या उद्देशाने अनेक जण धारधार मांज्याचा वापर करतात. या धारधार मांज्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पक्ष्यांना इजा पोहविण्याचा कोणाचाही उद्देश व हेतू नसतो, अगर कुणीही जाणूनबुजून करत नाही. परंतु स्पर्धेमध्ये आकाशात लांब गेलेल्या पतंगाच्या मांज्यामध्ये आकाशात भरार्या मारणारे पक्षी अडकून त्यांना इजा होण्याचा संभव असतो.
मकर संक्रांत एक दिवसांची असली तरी पतंगबाजी महिनाभर चालते. पतंग मांजासह झाडांच्या फांद्यात अथवा विजेच्या तारांमध्ये राहिल्यामुळे त्याच्या संपर्कात आल्यास पक्षी आणि छोटे प्राणी यामुळे जीवाला मुकतात. त्यामुळे पतंगांच्या हौशींनी साध्या सुती धाग्याचा वापर करावा म्हणजे त्यांची हौस पक्षांच्या जीवावर बेतणार नाही, असे आवाहन पक्षी आणि पर्यावरणप्रेमींनी केले आहे.