| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच सामाजिक न्याय दिनाच्या औचित्याने पनवेल येथे आयोजित करण्यात आलेला ‘समता मार्च’ विविध सामाजिक संघटनांच्या मोठ्या सहभागात यशस्वीरित्या पार पडला. मागील चार वर्षांची यशस्वी परंपरा कायम राखत यंदाचा समता मार्च अधिक व्यापक आणि प्रभावी ठरला. सकाळच्या सुमारास उरण, सायन, अंबरनाथ, मुंबई (सीएसटी), कामोठे, खांदा कॉलनी आणि पनवेल परिसरातील विविध समविचारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी अधिकाधिक समविचारी संघटनांना एकत्र आणण्याचा संकल्प यशस्वी झाला.
महा. अंनिस पनवेल, संविधान प्रचारक, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, ग्राम स्वराज समिती महाराष्ट्र, यूथ फॉर्म, धम्मयान संस्था तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, खांदा कॉलनी आदी संघटनांनी नियोजन, समन्वय, प्रशासनाच्या परवानग्या मिळविणे आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मार्चला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पनवेल मार्केट, बस स्थानकासमोरील सोनबा येलवे पाणपोई, वडाळे तलाव, धूतपापेश्वर कारखाना, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, कृष्णाळे तलाव, संत तुकाराम स्मारक आणि पनवेल बाजार मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मार्चचा समारोप करण्यात आला. संपूर्ण मार्गक्रमणादरम्यान सामाजिक न्याय, समता आणि संविधान मूल्यांचा संदेश देणाऱ्या घोषणा व प्रेरणादायी गीतांनी परिसर दुमदुमून गेला.






