ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ विकास प्राधिकरण हद्दीतील ममदापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाचे पाणी साचून रस्त्यावर तळ्याचे स्वरूप निर्माण झाले होते. याबाबत प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ममदापूर ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेत रस्त्याची दुरुस्ती केली.
ग्रामपंचायतीच्या निधीतून जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने रस्त्यावर टाकण्यात आलेला मातीचा भराव बाजूला करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत बिल्डरकडून बंद करण्यात आलेली नैसर्गिक पाण्याची मार्गिका खुली करण्यात आली. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. ममदापूर गावात जाणारा रस्ता पहिल्याच पावसात पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासक प्रतीक गायकवाड, ग्रामसेवक गणेश बढे यांनी पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले तसेच पाणी साचण्याचे कारण ठरलेला मातीचा भराव हटवला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.







