। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील मालाड पश्चिम भागातील एका लोकप्रिय आउटडोअर शूटिंग लोकेशनवर शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. माध-मरवे रोडवरील योगा आश्रमाजवळ असलेल्या ‘दाना पाणी भुल्लर गार्डन स्टुडिओ’मध्ये ही आग लागली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, सकाळी साडे सहा वाजता आगीची माहिती मिळाली. तत्काळ मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस तसेच पी-नॉर्थ विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.






