| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला खांदा वसाहत येथील आगरी शाळेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, मतदार यादीत नाव असणे ही प्रत्येक पात्र नागरिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सोसायट्यांमधून मोठ्या संख्येने नागरिक एसआयआर मॅपिंगसाठी आगरी शाळेत येत आहेत. केंद्रावर नियुक्त बीएलओ नागरिकांना आवश्यक माहिती देत अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे. तसेच नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती व बदलासंदर्भातील प्रक्रिया समजावून सांगण्याचे काम अत्यंत नियोजनबद्ध आणि आदर्शवत पद्धतीने करत आहेत. नागरिकांच्या विविध शंकांचे तत्काळ निरसन करून त्यांना आवश्यक फॉर्म उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असून नागरिकांकडूनही प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे स्वागत करण्यात येत आहे.
खांदा वसाहत येथील आगरी शाळेत हा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे अद्याप नावाची नोंद, दुरुस्ती किंवा अन्य बदल बाकी असलेल्या सर्व पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह केंद्राला भेट देऊन या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले.







