। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रायगड पोलिस दलासाठी दुचाकीसह चारचाकी वाहने देण्यात आली. या वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानात झाला. रायगड पोलिस दलाच्या ताफ्यात एकूण 66 वाहने दाखल झाली आहेत . त्यात 32 दुचाकी व 34 चार चाकी वाहनांचा समावेश आहे.
रायगड पोलिस दलांना सुरक्षेच्या दृष्टीने बळकटी देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाहनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या या वाहनांचा लोकार्पण सोहळा सोमवारी झाला.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, तहसिलदार मीनल दळवी, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस, रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात, पोयनाडचे पोलिस निरीक्षक राहूल अतिग्रे, मुख्यालय पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मोकल आदी मान्यवरांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच पोलीस बंदोबस्तांसाठी या वाहनांचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून पोलीस विभागासाठी नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला आज सुपूर्द करण्यात आली. पोलीस विभागामार्फत या वाहनांचा योग्य उपयोग करून पोलिसांमधील कार्यक्षमता व गतिमानता वाढण्यास मोलाची मदत होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले की, पोलीस वसाहतीतील जुन्या इमारतीच्या जागी नवी इमारत बांधण्याच्या प्रस्तावासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. पोलीस विभागाला अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.